पुणे : चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्यास आणखी खूप वेळ लागणार असल्याने तोपर्यंत लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण करून त्याची क्षमता वाढविण्याचा निर्णय दिल्लीत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुणे शहराला स्वतंत्र नागरी विमानतळ नसल्याने लोहगाव येथील लष्करी विमानतळाचा वापर केला जातो. पुणे जिल्ह्यासाठी चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे; मात्र तो प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यास बराच कालावधी लागेल. त्यामुळे लोहगाव विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने १० एकर जागा भाड्याने देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर एका खासगी व्यक्तीने त्याची २५ एकर जागा विमानतळासाठी देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. सध्याच्या लोहगाव विमानतळावरून दिल्ली, बंगळुरू, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, लखनौ, रांची, कोची, पाटणा, जयपूर, इंदूर, गुवाहाटी, जम्मू, मुंबई, नागपूर या शहरांमध्ये विमानसेवा पुरविली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई, फ्रँकफर्ट आणि अबूधाबी या शहरांना जोडले आहे. २००४-०५ वर्षामध्ये दररोज केवळ १६५ प्रवासी विमानप्रवास करीत होते, त्या वर्षी केवळ ६० हजार जणांनी विमानप्रवास केला. त्यानंतर झपाट्याने या संख्येत वाढ होत आहे. २००५-०६मध्ये ९० हजार, २००६-०७मध्ये १५ लाख, २०१०-११मध्ये २८ लाख, २०१३-१४मध्ये ३५ लाख व २०१४-१५मध्ये ४१ लाख, अशी विमानप्रवाशांच्या संख्येत वाढ होत गेली. (प्रतिनिधी)चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी केंद्राकडून २०० कोटीचांदणी चौकात एकाच ठिकाणी ५ रस्ते एकमेकांना मिळतात. हैदराबाद रस्ता, बंगळुरू रस्ता, सातारा रस्ता तसेच पुण्याकडून येणारा रस्ता या ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे नॅशनल हायवे आॅथारिटीकडून २०० कोटी रुपयांचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीकडून रस्त्याचे काम रखडल्याबद्दल त्यांच्या अधिकाऱ्यांना या वेळी खडसावण्यात आले. चांदणी चौकात उड्डाणपुलासाठी अत्यंत कमी जागा आहे; त्यामुळे अत्यंत नियोजनपूर्वक पुलाची उभारणी करावी लागेल. उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर येथील वाहतूककोंडी सुटण्यास मोठी मदत होईल.
लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण
By admin | Updated: September 10, 2015 04:20 IST