पुणे : शहरातील माजी सैनिक, हुतात्मा पत्नी, तसेच शौर्य पदकविजेते यांना पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मिळकतकरातून पूर्णत: सूट देण्यात आली आहे. सोमवारी (दि. ५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या निर्णयाबरोबरच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पुणे महापालिका हद्दीतील पहिल्या शंभर उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी पाच हजार रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले़
विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, हुतात्मा पत्नी, संरक्षण दलातील शौर्यपदक विजेते सैनिक यांना मिळकत करात सवलत द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. राज्य सरकारने यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला असल्याने पुणे महापालिका वगळता आत्तापर्यंत इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधितांना मिळकत करात सूट दिली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आणून कर सवलतीचा प्रस्ताव दिला. त्यानुसार एकमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला़
दरम्यान, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) पुणे महापालिका हद्दीतील अनेक विद्यार्थी परीक्षेत बसत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिकेने पुस्तके खरेदीसाठी पाच हजार रुपये मदत द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला. या प्रस्तावानुसार एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना या योजनेत प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके या निधीतून खरेदी करावीत असे यातून अपेक्षित आहे़