कोरोना काळात महानगर पालिकेचे सर्वच कर्मचारी कोरोना योध्याप्रमाणे काम करत आहेत. जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमध्ये काम करत आहेत. असे असताना केंद्र सरकार, राज्य सरकारमार्फत कोणतेही विमा कवच मात्र मिळालेले नाही.
मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याबरोबर संपर्क केला असता ते म्हणाले की, अनेक वेळा राज्य शासनाला निवेदने दिले तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. विमा कवच मिळण्यासाठी दोन्ही सरकारे उदासीन असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. पुणे महानगरपालिकेकडून मात्र सर्व कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. विमा सुविधेचा फायदा प्राप्त करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या १५ जणांच्या कुटुंबीयांना त्याचा फायदा मिळाल्याचे शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.
महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांना स्वतःला विम्याबद्दल काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. अशावेळी जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना त्या सुविधेचा फायदा मिळेल याबाबत शंकाच आहे.