पुणे : गेले पस्तीस दिवस सुरू असलेली विधानसभा निवडणूक प्रक्रियेची रविवारी (दि. १९) शांततेत सांगता झाली. तब्बल साठ हजार कर्मचारी, पोलीस, होमगार्ड व एसआरपीएफ जवानांच्या सहकार्याने ही निवडणूक पार पाडण्यात आली. मतदारयादीबाबत घेण्यात आलेल्या दक्षतेमुळे लोकसभेच्या गोंधळाची यंदा पुनरावृत्ती झाली नाही. निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत होते. पोलीस प्रशासनानेदेखील आपली भूमिका चोख पार पाडत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ दिला नाही. मतदानप्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी १४ हजार पोलीस, होमगार्ड, एसआरपीएफचे जवान व तब्बल ४५ हजार कर्मचारी झटत होते. तसेच मतमोजणीसाठी तीन हजारपेक्षा अधिक कर्मचारी आणि तेवढाच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रचार, कोपरासभा, रॅलीला परवानगी देणे, नेत्यांच्या हवाई सफरीवर लक्ष ठवणे, जाहिरांतीवर बारकाईने नजर ठेवणे अशा विविध पातळीवर कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते. जिल्ह्यात७ हजार ४७५ मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ४४ बॅलेट युनिट व १२ हजार ५७४ कंट्रोल युनिट यंत्राचा वापर करण्यात आला. (प्रतिनिधी)
निवडणूक शांततेत पार
By admin | Updated: October 19, 2014 23:32 IST