वालचंदनगर : भटक्या समाजापैकी एक दुर्लक्षित होत चाललेला समाज म्हणून डवरगोसावी समाजाकडे पाहिले जाते. आजही हा समाज म्हटलं, की गावकुसाबाहेर पालं ठोकून तात्पुरते वास्तव्य करणारा समाज डोळ्यांसमोर उभा राहतो. अठराविश्वे दारिद्य्रात आजही हा समाज आपले जीवन जगत आहे. बहुरुपी बनून महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला. त्यावर घरातील आठ माणसांचा सांभाळ करण्यात आला. परंतु, सध्या दान करीत नसल्यामुळे उपासमारीची वेळ सर्वच भटक्या समाजातील माणसांवर येऊन ठेपली आहे. या समाजातील कुटुंबातील माणसाला शासनाच्या योजना दिल्यास हा समाज समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. असे बहुरुपी प्रकाश साळुंके यांनी सांगितले. नाथपंथीय डवरगोसावी हा समाज महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकाच शिल्लक आहे. आजही अठराविश्वे दारिद्य्रातच जीवन कंठित करताना दिसत आहे. वडिलोपार्जित व्यवसाय प्रकाशने वयाच्या १० व्या वर्षातच स्वीकारला. आज जवळजवळ ३४ वर्षे बहुरुपी बनून महाराष्ट्रातील माणसाची करमणूक केली. शाळेत कसलेच पाऊल न टाकलेल्या पाच मुली रेश्मा, अनिता, काजल, मंगल, रेखा यांपैकी रेखाचे लग्न अवघ्या ३ हजार ५०० रुपयांत करण्यात यश आले. मुलगा सागर हुशार असल्याने १० वीपर्यंत शिक्षण घेण्यात आले. धाकटा महेश रोजंदारी करून उपजीविका भागविण्यासाठी बाहेरगावी आहे. या समाजाला आजही गावाच्या बाहेरच वास्तव्य करून उपजीविका भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (वार्ताहर)
अठराविश्वे दारिद्य्रात जगतोय डवर
By admin | Updated: February 11, 2017 02:36 IST