पुणे : गणेशोत्सवाचे पावित्र्य टिकविताना पर्यावरणाचेही रक्षण व्हावे, याविषयी पुणेकरांत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शाडूमातीच्या पर्यावरणपूरक गणपतींना मोठी मागणी आहे. गणेशोत्सव म्हणजे पुणेकरांसाठी सळसळता उत्साह. गणेशमूर्तीची खरेदी हा संपूर्ण कुटुंबासाठी एक सोहळा असतो. आवडीचा गणपती आपल्यालाच मिळावा म्हणून त्याचे बुकिंगही ग्राहकांनी केली आहेत. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही गणरायाच्या वेगवेगळ्या मूर्ती ग्राहकांना आकर्षित करत आहेत. शाडूच्या मातीच्या मूर्ती करायला खूप अवधी लागतो. मात्र, तरीही ग्राहकांचा कल वाढल्याने बाजारात शाडू मातीतील मूर्तींची संख्या वाढताना दिसत आहे. बाजारात जयमल्हार, गरूडावर बसलेल्या, बालगणेशा, समुद्रातील, रेस बाईकवरील, बुलेटवरील गणपती अशा आधुनिक काळाशी साधर्म्य असणाऱ्या गणेशांनाही यंदा बरीच चलती आहे.मूर्तिकार महेश शिंदे म्हणाले, ‘‘आमच्याकडे गौरी-गणपती, तसेच अन्य सगळ््या प्रकारच्या मातीच्या वस्तू बनविल्या जातात. शाडूच्या मातीच्या गणपतींना बाजारात जास्त मागणी आहे. शाडूच्या मातीचे गणपती आम्ही आॅर्डरप्रमाणे देतो.
आमच्याकडे आताच ५०० पेक्षा जास्त आॅर्डर बनविले जातात.’’आपल्या मनातील बाप्पा आपणच साकारण्याकडेही हल्ली पुणेकरांचा कल वाढला आहे. त्यामध्ये निर्मितीचा नवा आनंदही मिळतो. पुष्पा दरेकर म्हणाल्या, ‘‘गौरी-गणपतीच्या मूर्ती या आम्ही आमच्या घरीच बनवितो. मला गौरी आणि गणपती या दोन्ही मूर्ती बनवायला आवडतात. गौरीचे मुखवटे बनविताना त्यांचे डोळे बनवायला जास्त अवघड असतात; कारण डोळे जेवढे आकर्षक असतील तेवढे मुखवटे अधिक सुंदर दिसतात. मनात भक्ती आणि श्रद्धा असेल, तर कितीही मूर्ती बनवायला आम्ही तयार असतो आणि अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करतो.’’अभिलाष पुराणिक म्हणाले, ‘‘गणेशोत्सव हा एक आनंददायी सण आहे. या दिवशी निसर्गाची हानी करणे सर्वांनीच टाळले पाहिजे. प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती स्वस्त असल्या तरी त्यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळेच आम्ही यंदा शाडूच्या मातीची मूर्ती आणणार आहोत.’’ (प्रतिनिधी)