पौड : मुळशी तालुक्यातील अनेक गावे इको सेन्सेटिव्ह झोनअंतर्गत आरक्षित करण्यात आली असून, त्यांतील ताम्हिणी घाट परिसरात असलेली निवे, वारक व पिंपरी ही वनीकरण विभागाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील गावे आहेत. दुर्दैवाने याच परिसरात शनिवार व रविवारच्या दिवशी पावसाळ्यानिमित्त हजारो पर्यटक शहरातून फिरण्यासाठी येतात. यातील अनेक पर्यटक सभोवतालच्या पर्यावरणाचा विचार न करता बेतालपणे वर्तन करून येथील वन्यजीवसृष्टीला व परिसराला त्रास होईल, असे वागत असतात. दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करणे, साऊंड सिस्टीमवर मोठमोठ्याने गाणी लावून नाच करणे, खाद्यपदार्थांचे रिकामे प्ल्ॅस्टिक पाऊच, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोलची ताटे, दारूच्या रिकाम्या बाटल्या यासारख्या वस्तू परिसरात अस्ताव्यस्त फेकून देततात. पळसे गावापासून पिंपरी गावापर्यंत व एकूण ताम्हिणी घाट परिसरात हा सर्व नंगा नाच खुलेआम चालू असतो. या सगळ्याला आवर घालण्याची जबाबदारी खरे तर पोलिसांच्या बरोबरीनेच वन विभागाचीही आहे.याबाबत पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. खलाटे यांना माहिती विचारली असता ते म्हणाले, की ताम्हिणी घाटातील निवे, पिंपरी, वारक ही गावे अतिसंवेदनशील असून, त्या गावांतील वने व वन्यजीव यांचे संरक्षण होण्यासाठी वन विभागाकडून त्या-त्या गावातील नागरिकांची स्थानिक व्यवस्थापन समिती तयार केली आहे. स्थानिक नागरिकांनीच हा वनांचा होणारा ऱ्हास व पर्यावरणाला ज्या पर्यटकांकडून हानी पोहोचत असेल, त्यांना रोखण्याची व्यवस्था करायला हवी. आमच्या निदर्शनास अशी नियमबाह्य बाब आढळून आल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई करू, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)
इको सेन्सेटिव्ह झोन कागदावरच
By admin | Updated: July 10, 2015 01:13 IST