पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ निवडणूक लढत आहेत. मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. मोहोळांसाठी काल (शुक्रवारी) प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा पार पडली. आज भाजप नेते नितीन गडकरी यांनीही भाजपच्या उमेदवारासाठी पुण्यातील नातूबाग मैदानावर प्रचारसभा घेतली. पुण्यात बोलताना ते म्हणाले, अनेक दिवसानंतर पुण्यात येण्याची वेळ आली. आज गिरीश बापट आणि मुक्ता टिळक नाहीत. बापटांसोबत माझे खूप जवळचे सबंध होते. बापट पुण्यातील दोन प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते. त्यातील एक विमानतळाचा आणि दुसरा मेट्रोचा. आज दोन्ही प्रश्न मिटले आहेत, असंही गडकरी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, रिंगरोडचे काम पण गतीने सुरू होईल. मुबई-पुणे हायवे झाला त्यावेळीच मी पुढच्या २५ वर्षांचा विचार करायला हवा होता, त्यावेळी चूक झाली. पण आता पुण्यात रिंगरोड झाल्याने अनेक समस्या सुटतील. शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. पुणे-औरंगाबाद अंतर दोन तासावर येईल. पुणे-नाशिक रस्ता पण लवकरच पूर्णपणे सुरू होईल. निवडणुकीनंतर अनेक रत्याची कामं वेगाने सुरू होतील. पंढरपुरला जाणाऱ्या पालखी मार्गाला भक्ती मार्ग करणार असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.
आम्ही १० वर्षात अनेक समस्या सोडवल्या-
पुणे शहर हे फास्ट गोईंग सिटी आहे. यासाठी दुसरी सिटी वसवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता मुरलीधर मोहोळ खासदार झाले की त्यांनी हे करावं, असं गडकरी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ६० वर्ष काँग्रेस काळात समस्या सुटल्या नाहीत तर गंभीर झाल्या, आम्ही १० वर्षात अनेक समस्या सोडवल्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पायाभुत सुविधांन महत्व दिले. सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज देशातील वस्तू आणि सेवांची निर्यात तीन पटीने वाढली आहे. इथेनॉल पंप सुरू झाले आहेत. देशात अनेक कंपन्यांनी इथेनॉल दुचाकी तयार केल्या आहेत. आज देशात अनेक इलेक्ट्रिक कार, बस आल्या आहेत, असंही गडकरी म्हणाले.
अंत्यसंस्कार ब्राम्हणाकडून का केले?
६० वर्षात काँग्रेसने केलेली कामाची तुलना केली तर आम्ही १० वर्षात केलेली कामे तीन पटीने काँग्रेस पेक्षा जास्त काम केलं आहे, असा दावाही गडकरी यांनी केला. पुढे ते म्हणाले, देशातील सर्वांना हक्काचे घर आणि नोकरी मिळेपर्यंत आम्ही काम करणार. माझ्याकडे आई बाबाच फोटो नाही पण छत्रपती शिवाजी महाराज फोटो आहे. आम्ही एकही मशीद तोडण्याच काम केलं नाही. तुम्ही धर्मनिरपेक्ष होता तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार ब्राम्हणाकडून का केले? असा सवाल गडकरींनी केला.