वाघोली : पुणे-नगर महामार्गावरील साईडपट्ट्या खोदून विनापरवाना रात्रीच्या वेळी केबल टाकण्याचे काम सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार करीत आहेत. रात्रीच्या वेळी विनापरवाना खोदकाम करीत असताना एक जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.पुणे-शिरूर महामार्ग बांधून पूर्ण झाला. गेल्या वर्षी या रस्त्यावरील टोल बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाने डागडुजीचे काम हाती घेतले आहे.डागडुजीचे काम चालू असले तरीही महामार्गाच्या दोन्ही बाजूने साईडपट्ट्यांच्या कडेला ठिकठिकाणी खासगी कंपन्यांकडून रात्रीच्यावेळी खोदकाम केले जात आहे. रस्त्याच्या कडेलाच राडारोडा टाकला जात आहे. ठराविक अंतरावरील खोदाईची कामे रात्रीच्या वेळीच पूर्ण करून सकाळपर्यंत माती टाकून काम केलेच नसल्याचे भासवले जाते.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्ही ठराविक काम वगळता कोणासही परवानगी दिली नसल्याचे सांगितले जाते. वाघोली आणि लोणीकंद परिसरामध्ये ही कामे जोरदार सुरू असल्याने बांधकाम विभागाचे यावर नियंत्रणच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. लोणीकंद पोलिसांनी नुकताच रात्रीच्या वेळी अशाप्रकारे खोदाई करताना एक जेसीबी ताब्यात घेतला असून, खोदाईची कोणतीही परवानगीच नसल्याचे उघड झाले आहे. (वार्ताहर)वाघोलीपासून शिरूरपर्यंत ५४ किलोमीटरच्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे मनुष्यबळ कमी पडत आहे, यामुळे सर्वच ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य होत नाही. विनापरवाना खोदाई करीत असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- जी. ए. गवळी, शाखा अभियंतामहामार्गालगतच विनापरवाना खोदाई करणाऱ्या एका ठेकेदाराबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यांनी तत्काळ काम बंददेखील केले. ठेकेदार मनमानीपद्धतीने करीत असेल, तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अर्थकारण सुरू असल्याची शक्यता आहे.- शिवदास पवार, नागरिक
नगर महामार्गालगत विनापरवाना होत आहे खोदाई
By admin | Updated: June 18, 2015 00:05 IST