इंदापूर : वाहन तपासणीसाठी पोलीस खात्याने केलेल्या नाकेबंदीमुळे १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ८ दुचाकींची चोरी उघडकीस आली. एका अल्पवयीन गुन्हेगारांसह तीन आरोपी पकडण्यात इंदापूर पोलिसांना यश मिळाले. दुचाक्याही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सुधीर भारत खराडे (वय २२ वर्षे), रोहित लक्ष्मण साळुंखे (वय १७ वर्षे),अजय दिलीप जगताप (वय १९ वर्षे, सर्व रा. हिंगणगाव, ता. इंदापूर)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील रोहित साळुंखे या अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.या प्रकरणाची सविस्तर हकिगत अशी, की रविवारी (दि. २९ नोव्हेंबर)आठवडा बाजाराच्या दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नगर परिषदेलगत वाहन तपासणीसाठी नाकेबंदी केली होती. त्या वेळी रोहित साळुंखे व सुधीर खराडे हे दोघे टीव्हीएस कंपनीच्या अपाचे (क्र. एमएच ४२ पी ४७४६)या दुचाकीवरून तेथून चालले होते. साळुंखे याचे वय पाहून सहायक पोलीस निरीक्षक नाळे यांना संशय आला. त्यांनी, त्याचेकडे दुचाकीची कागदपत्रे व दुचाकी चालवण्याचा परवाना मागितला. यावर साळुंखे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर, त्यांनी या दुचाकीसह एकूण आठ दुचाक्या चोरल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी इंदापूर, टेंभुर्णी (जि. सोलापूर), जरंडेश्वर या ठिकाणावरून या सर्व दुचाकी जप्त करून आणल्या. (वार्ताहर)
नाकाबंदीमुळे दुचाकींची चोरी उघड
By admin | Updated: December 9, 2015 00:20 IST