पुणे : सुट्या पैशांच्या प्रश्नामुळे भाविकांमधील औदार्यही कमी झाले असून, राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला रोज अभिषेक, देणग्या या माध्यमांतून मिळणाऱ्या ८० ते ९० हजार रुपयांचा ओघ आता केवळ अडीच ते तीन हजार रुपयांवर आला आहे.पुण्यातीलच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतील नागरिकांची वर्दळ दररोज दगडूशेठ गणपती मंदिरात असते. नामवंत अभिनेते, राजकारणी आदींनी या गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावलेली आहे.‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा असल्याने देणग्या, अभिषेक यांसाठी मंदिराला रोख स्वरूपात पैसे दिले जातात. गणपतीच्या मूर्तीची छायाचित्रेही विकली जातात. त्याची पावती सुवर्णयुग मंडळातर्फे दिली जाते. देणगीदारांचा, अभिषेककर्त्यांचा ओघ कमी झाला असून, आठवडा उलटल्यानंतरही तीच स्थिती कायम आहे. मंदिरातील दानपेटी शनिवारी रात्रीपासूनच सील करण्यात आली आहे. मंडळाचे पदाधिकारी सुनील रासने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दानपेटी शनिवारी सील केली जाऊन आठवड्यात जमा झालेला निधी तपासला जातो. पाचशे-हजाराच्या नोटांवर बंदी आल्यानंतर अध्यक्ष अशोक गोडसे यांनी काही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पेटी सीलबंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांमध्ये प्रथमच असा प्रकार झाला आहे, असे रासने यांनी नमूद केले.(प्रतिनिधी)
‘श्रीमंत’ दगडूशेठच्या देणग्यांचा ओघही आटला
By admin | Updated: November 13, 2016 04:25 IST