पुणे : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४० वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने आणि २४२ वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र मागील दोन महिन्यांत निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी केले आहे. शहर वाहतूक शाखेकडून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्रपणे राबविली आहे. वर्षभरात एकूण ४९२५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्य प्राशन केलेल्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर खटले दाखल केले जातात. हे खटले पुढील कारवाईसाठी मोटार वाहन न्यायालयात पाठविण्यात येतात. वाहतूक शाखेकडून गेल्या दोन महिन्यांत ५२० खटले न्यायालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी २६१ खटल्यांचा निकाल लागलेला असून २४१ वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र कमीत कमी दोन महिने व जास्तीत जास्त १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे, तर ४० वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने कमीत कमी एक महिना ते जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येकी २ हजार व त्यापेक्षा जास्त दंड करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मद्य प्राशन करून वाहन चालवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 04:07 IST