पुणे : राज्यात कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र ʻकृषी व अन्न प्रक्रिया संचलनालयʼ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचे मुख्यालय हे पुण्यात असणार आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत होत असलेली वाढ, खाण्याच्या प्रवृत्तीत झालेला बदल, उत्पन्नातील वाढीमुळे सुधारलेले जीवनमान आणि वाढत्या नागरीकरणाबरोबर कुटुंबात दुहेरी उत्पन्नाकडे वाढत असलेला कल, या पार्श्वभूमीवर राज्यात कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासाला मोठा वाव असल्यामुळे, नवीन संचलनालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती कृषी विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. देशातील सर्वाधिक अन्न प्रक्रिया उद्योग आपल्या राज्यात आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूकदेखील या क्षेत्रामध्ये झालेली आहे. आतापर्यंत राज्यात ३ मेगा फूड पार्क आणि ७ फूडपार्क उभारले आहेत. इतकेच नव्हे तर कृषी प्रक्रिया समूह, शीतसाखळी प्रकल्प आणि फॉरवर्ड-बॅकवर्ड लिंकेजचीही उपलब्धता मोठ्या प्रमाणावर करून दिली आहे. या सुविधांच्या विकासामुळे अन्न प्रक्रिया उद्योगावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
तयार झालेल्या मालाच्या निर्यातीसाठी राज्यात ३ आंतरराष्ट्रीय विमानतळं, मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरांची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय मोठा समुद्रकिनारा पोषक ठरणारा आहे.
या मूलभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर, प्रक्रिया उद्योगासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे मात्र त्याप्रमाणात उद्योग सुरू न झाल्यामुळे स्वतंत्र ʻकृषी व अन्न प्रक्रिया संचलनालयʼ, सुरू करून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
या संचलनालयांतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्यातीने कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचे सुसुत्रीकरण करण्यात येईल. त्यात, गट शेती, जैविक शेती मिशन, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, ऑपरेशन टोटल ग्रीन, स्मार्ट, पोकरा, मॅग्नेट अशा सर्व योजनांचा समावेश असेल.
लाभार्थ्यांची निवडही हेच संचलनालय करेल, त्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येईल, ʻविकेल ते पिकेलʼ या नवीन धोरणाची सांगड घालण्यात येईल. त्याद्वारे, अन्न प्रक्रिया उत्पादनांसाठी ʻमहाराष्ट्र ब्रँडʼ विकसित करण्यात येईल.
.............
या आठवड्यात बैठक
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत कृषी व अन्न प्रक्रिया संचलनालयाच्या रचनेला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून तयारी करण्यात येत आहे.