पुणे : पाकिस्तान आणि चीनने भारताची बळकावलेली जमीन परत द्यावी, याकरिता मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे मंगळवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. लतीफ मगदूम यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.
मंचातर्फे संपूर्ण देशभरात जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंत १० जानेवारीपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानने भारताचा अधिकृत भाग म्हणजे पाकव्याप्त जम्मू, काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान हा भारताचा भू-भाग ताब्यात घेतला आहे. तसेच अकसाईचीन हा भू-भाग चीनने काबीज केलेला आहे. तो संपूर्ण भारताचा भू-भाग भारताला परत द्यावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने भेटून जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या शिष्टमंडळात मंचाचे प्रदेश संयोजक अली दारूवाला, महाराष्ट्र प्रदेश महिला संयोजक मिनाज शेख, संयोजक राजू तांबोळी, युनुस मगदूम, राजू शेख, निजाम खान, श्रीनिवास कांबळे आदींचा समावेश होता.