पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने मांडुळांसह कासवांची तस्करी करणाऱ्या तिघा जणांना गजाआड केले आहे. पोलिसांनी दोन मांडुळे आणि दोन कासवे जप्त केली आहेत. काळ्या जादूसाठी या प्राण्यांचा वापर करण्यात येत असून, बाजारातील त्यांची किंमत ३५ लाख रुपये असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. सिद्धार्थ ज्ञानेश्वर काठोते (वय २०, रा. जनता वसाहत, दत्तवाडी, मूळ जालना), शाकीर जमील शेख (वय १९) व फरदिन अशरफ खान (वय १९, रा. डोणजेगाव, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वन्य जीवन संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांचे मित्र असलेले आरोपी किरकोळ स्वरूपाची कामे करतात. हे तिघेही मांडूळ आणि कासव घेऊन येणार असल्याची माहिती युनिट दोनला मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या पथकाने सापळा लावला. बनावट ग्राहकामार्फत खात्री करून जनता वसाहत परिसरात सापळा रचून या तिघांना अटक केली. त्यांच्याकडे दोन पिशव्यांमध्ये मांडूळे आणि कासवे मिळून आली.
मांडुळांची तस्करी उधळली
By admin | Updated: February 15, 2017 02:30 IST