पुणे : व्यक्ती पदाने नव्हे तर कार्याने मोठा होत असतो. आपला समाज बारा बुलतेदारांनी मिळून बनलेला आहे. सर्वांना विकासाच्या समान संधी मिळणे आवश्यक आहे. आजवर आरक्षणावर केवळ राजकारण केले गेले. ज्या समाजाला आरक्षण आहे, त्याच समाजातील नेतृत्वाने हा प्रश्न भिजत घोंगड्यात ठेवला. समाजाला प्रश्नांत गुंतवून, गुरफटून ठेवायचे, त्याचे राजकारण करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची असे न करता, यापुढील काळात समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा लागेल. जाती-धर्मापलीकडे जाऊन काम केले तरच समाज स्वीकारेल. भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे, याचे भान एव्हाना सर्वांना आलेच असेल, असे मत मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. सासवड माळी शुगर फॅक्टरीतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील माळी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापट बोलत होते. व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, समाज कल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड, योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, मोहन लांडे, आदी उपस्थित होते. सासवड माळी शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत केले. व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे राजेंद्र गिरमे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैशाली बनकर, बापुसाहेब कर्णे गुरुजी, योगेश ससाणे, प्रिया गदादे-मेढे, लता धायरकर, रुपाली धाडवे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)बापट म्हणाले, ‘पदापेक्षा समाजाच्या उन्नत्तीसाठी काम केल्यास पदानंतरही समाज आपल्याला स्मरणात ठेवतो. आज आपण विद्यमान पदाधिकारी आहोत. परंतु, समाज केंद्रस्थानी ठेऊन समाजातील सर्वात शेवटच्या माणसाच्या विकासात हातभार लावणे आवश्यक आहे.’
समाजाचा विकास केंद्रस्थानी ठेवावा
By admin | Updated: March 29, 2017 02:00 IST