पुणे : ‘‘पुणे माझे फार आवडते शहर आहे. याचा फार झपाट्याने विकास होत आहे. विकास करा, पण झाडे कापू नका. मला त्यामुळे फार त्रास होतो. मला त्यासाठी आंदोलनच करावेसे वाटते,’’ असा संदेश ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी दिला. ‘वरदलक्ष्मी चित्र’ या निर्मिती संस्थेच्या वतीने शुक्रवारी १९व्या ‘उमेद पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक धनंजय दातार यांच्या हस्ते अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेता झाकीर हुसेन, सौरभ शुक्ला, अमेय वाघ, गायिका रेखा भरद्वाज, अभिनेत्री हेमांगी कवी, प्रसिद्ध् नर्तक व नृत्यदिग्दर्शक राघव जुयाल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, पैठणी असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध नर्तक आशिष पाटील यांच्या ‘नृत्यांगण’ कला अकादमीच्या कलाकारांबरोर त्यांनी गणेशवंदना सादर केली. त्यानंतर हास्यसम्राट दीपक देशपांडे यांचे सादरीकरण झाले. हा पुरस्कार माझ्यासाठी फार आनंदाचा आहे, अशा शब्दांत शर्मिला टागोर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वयातही आपल्याला शिट्ट्या आणि तरुणांकडून भरभरून प्रेम मिळत असल्याचा आनंद वर्षा उसगावकर यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी रेखा भारद्वाज, सौरभ शुक्ला, झाकीर हुसेन, हेमांगी कवी, राघव जुयाल, अमेय वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजक महेश टिळेकर म्हणाले, ‘‘हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मानचिन्ह नसून पुणेकरांचे प्रेम आणि आशीर्वाद आहे.’’ स्मिता गवाणकर यांनी निवेदन केले. (प्रतिनिधी)‘‘मराठी माणूस नेत्यांच्या मागे धावतो. माझे तरुणांना सांगणे आहे, नेत्यांच्या मागे जाऊ नका. कामं करा. बाहेर मराठी माणसाला गुंड समजले जाऊ लागले आहे. आपली ही प्रतिमा बदला. खूप काम आहे. त्या कामाच्या शोधात राहा.- धनंजय दातार, ज्येष्ठ उद्योजक
विकास करा; पण झाडे जपा
By admin | Updated: May 23, 2015 00:44 IST