शिवाजीनगर येथील जंगली महाराज रोडला लागून एकबोटे कॉलनीत वाहनतळ आहे. या वाहनतळावर पोलीस दलातील काढून टाकलेली वाहने, तसेच गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली दुचाकी, चारचाकी वाहने अनेक वर्षांपासून ठेवण्यात आली आहेत. हे वाहनतळ अनेक महिन्यांपासून कुलूप लावून बंद आहे. ही वाहने भंगारात जमा झाली असून, त्यांच्या आजूबाजूला गवतही वाढले आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक या वाहनांना आग लागली. अग्निशमन दलाला दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी या आगीची माहिती मिळाली. कसबा, एरंडवणे व नायडू केंद्राचे स्टेशन अधिकारी राजीव जगताप विजय भीलारे, सुनील नाईकनवरे यांच्यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाण्याचा मारा करून काही मिनिटात ही आग विझविली. या गाड्यांचे टायर पेटल्याने परिसरात मोठा धूर झाला होता.
या आगीत १५ ते २० चारचाकी, १५ ते २० दुचाकी, ५ रिक्षा, १ छोटा हत्ती, १ पोकलॅंड मशिन आगीत जाळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.