पुणे : पुणे शहरातील ८ मतदारसंघांत उभे राहिलेल्या ११७ उमेदवारांपैकी १०० उमेदवारांना आपले डिपॉझिटही राखता आलेले नाही. एकूण झालेल्या मतदानापैकी एक षष्ठांश मतेही या उमेदवारांना मिळू शकली नाहीत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे. केवळ सतराच उमेदवारांनी एक षष्ठांश मतांचा आकडा पार केल्याने त्यांचे डिपॉझिट राखले गेले. पर्वती आणि कसबा मतदारसंघात तर विजयी उमेदवार सोडून सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये विविध पक्षांच्या दिग्गजांचा समावेश आहे.विरोधक चारीमुंड्या चितपर्वती मतदारसंघात विजयी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या माधुरी मिसाळ सोडून उर्वरित तेराच्या तेरा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, राष्ट्रवादीचे सभागृह नेते सुभाष जगताप या दिग्गजांसोबत शिवसेनेचे सचिन तावरे व मनसेचे जयराज लांडगे यांचाही समावेश आहे.कसबा पेठ मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार गिरीश बापट वगळता इतर सर्व १२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यापैकी काँग्रेसचे राष्ट्रीय संघटक रोहित टिळक, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक रवींद्र धंगेकर या दिग्गजांना आपले डिपॉझिटही राखता आलेले नाही.खडकवासला मतदारसंघातील विजयी उमेदवार भीमराव तापकीर व राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बराटे वगळता उर्वरित १० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, काँग्रेसचे श्रीरंग चव्हाण, मनसेचे राजाभाऊ लायगुडे यांचा समावेश आहे.कोथरूड मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवार मेधा कुलकर्णी आणि शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे वगळता उर्वरित ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती प्रमुख बाबूराव चांदेरे, मनसेचे नगरसेवक किशोर शिंदे, काँग्रेसचे उमेश कंधारे यांचा समावेश आहे.वडगाव शेरी मतदार संघातील भाजपचे विजयी उमेदवार जगदीश मुळीक, शिवसेनेचे सुनील टिंगरे आणि राष्ट्रवादीचे बापू पठारे वगळता उर्वरित १५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यापैकी एक असलेल्या काँग्रेसचे चंद्रकांत छाजेड, मनसेचे नारायण गलांडे यांना आपले डिपॉझिट राखण्यात अपयश आले. (प्रतिनिधी)
डिपॉझिट जप्तची ‘शंभरी’!
By admin | Updated: October 19, 2014 23:42 IST