पुणे : संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरीला जाण्यासाठी १७ जून रोजी हरिनाम गजरात माऊली मंदिरातून प्रस्थान होईल.आळंदी देवस्थानामध्ये पालखी सोहळा २०१७ साठीचा नियोजनपूर्व आढावा घेण्यासह पालखी सोहळ्याचे कार्यक्रम वेळापत्रक, श्रींचा नैवेद्य, मोकळा समाज, दिंड्यादिंड्यांची उतरण्याची जागा, पालखीतळ नियोजन, स्वच्छता, अधिकृत-अनधिकृत दिंड्या समस्या, भाविक, वारकरी सेवासुविधा, वाहतूक, वाहन पास, ध्वनिप्रदूषण, सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम आदींसाठी दिंडीचालक, मालक, व्यवस्थापक, प्रमुखांची बैठक प्रथमच अनेक वर्षांनंतर पंढरपूरऐवजी आळंदी मंदिरात झाली.या बैठकीला पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर (पवार), राजेंद्र आरफळकर पवार उपस्थित नव्हते. या वेळी श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थानाचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे, योगेश देसाई, चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळ्यातील दिंडीचालक, मालक, व्यवस्थापक व फडकरी उपस्थित होते. या वर्षी शनिवारी १७ जूनला सायंकाळी श्रींच्या वैभवी पालखीचे प्रस्थान होणार आहे. प्रस्थानानंतर पहिला मुक्काम आळंदी देवस्थानाने नव्याने विकसित केलेल्या दर्शनबारी मंडपात जुन्या गांधी वाड्यातील जागेत होईल. (प्रतिनिधी)
‘माऊलीं’चे प्रस्थान १७ जूनला
By admin | Updated: April 25, 2017 03:59 IST