कोरोना मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य, पत्रकारांना प्राधान्याने लसीकरण करण्याची विनंती, आमदार भिमराव तापकीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली मागणी.
पांडुरंग मरगजे
धनकवडी : सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पत्रकारांना सुद्धा प्राधान्याने लस द्यावी अशी मागणी आमदार भिमराव तापकीर यांनी केली आहे.
दरम्यान कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नुकतेच एएनआय वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचं कोरोनामुळे मुंबईत निधन झालं. अशाचप्रकारे जवळपास शंभर पत्रकारांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भिमराव तापकीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रकारांसाठी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य आणि पत्रकारांना प्राधान्याने लसीकरण करावे अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.
आमदार तापकीर लोकमतशी बोलताना म्हणाले, पुण्यात कोरोना मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे. हे सर्व पत्रकार ग्रामीण भागातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसमोर उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान देशभरातील असे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबा वर कोरोना मुळे ओढावलेली परस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारतर्फे कोरोना मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत केली आहे.
राज्य शासनाने हि राज्यातील अशा कोरोना मुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांसाठी मदत योजना जाहीर करावी, किमान पाच लाखांची मदत अशा कुटुंबियांना द्यावी. तसेच तापकीर म्हणाले मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. माझी ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी.