पिरंगुटमधील अनेक कंपन्यांकडे स्वत:ची अग्निप्रतिबंधक यंत्रणा आहे की नाही, याचे ऑडिट शासकीय यंत्रणेमार्फत होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. पिरंगुट एमआयडीसी भागात विविध केमिकल कंपन्या आहेत. त्याठिकाणी ज्वलनशील पदार्थांची निर्मिती होत असतानाही याठिकाणी अग्नि प्रतिंबधक यंत्रणा आहे की नाही, याचे ऑडिट होत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली असून, याला जबाबदार कंपनी, ग्रामपंचायत की पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. उरवडे गावच्या हद्दीत असलेल्या कंपनीमध्ये क्लोरिन व कार्बन डायऑक्सआईड निर्मितीच्या काही कंपन्या आहेत.
पिंरगुट एमआयडीसी हा भाग ग्रामीणमध्ये असला, तरी पीएमआरडीएच्या हद्दीत आहे. या ठिकाणी असलेल्या कंपन्यांवर शासकीय यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नाही. या भागात अग्निशमक यंत्रणा उभरण्याची आवश्यकता होती. शिवाय या कंपन्यांतील कामगारांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले होते का, असे विविध मुद्दे या निमित्ताने स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.