देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासाठी चांदीच्या पालखी रथाला पारंपरिक पद्धतीने चकाकी देण्यात आली. श्री संत तुकाराममहाराजांची पालखी, रथ, गरुडटक्के, अब्दागिरी, समई, पूजेचे ताट, चौरंग, पाट, सिंहासन, प्रभावळ, मंदिरातील दरवाजे, दरवाजाच्या चौकटी,दानपेट्या, मानाचा चोपदाराचा चोप (दंड) यांना चकाकी देण्यात आली, अशी माहिती यासाठी सेवाभावी वृत्तीने मदत करणाऱ्या प्रसिद्ध व्यावसायिक अनिल रांका यांनी दिली. पालखी, रथ आणि इतर वस्तूंना चकाकी देण्यासाठी रांका यांच्या वतीने ३० कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. तज्ज्ञ कर्मचारी महेश शिंदे, दिलीप पाल, सचिन कटके, सिद्धू सोनेवाड, दत्तात्रय पेठे, बुद्धिवान कांबळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी हे काम सकाळी अकरा वाजता सुरू करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण केले. रथासह सोहळ्यातील विविध साहित्याला चकाकी देण्यासाठी २५ किलो चिंच व त्याचे पाणी, १५ किलो रिठे, साधारणत: २०० लिंबांचा रस, सात लिटर चकाकी देण्याचे विशिष्ट रसायन, सहा किलो पीतांबरी आणि याशिवाय तारे, फरशी, पेंटिंग ब्रश असे ३५ विविध ब्रश बापरून रथ, पालखी व इतर साहित्याला चकाकी देण्यात आली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे व पालखी सोहळाप्रमुख सुनीलमहाराज मोरे, रायबा मोरे, संभाजीमहाराज मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
देहूत रथ, पालखीला चकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 02:18 IST