पुणे : सध्या हिंदी-मराठी वाहिन्यांवरील अनेक मालिकांच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला धक्का पोहोचविणाऱ्या अतिरंजित घटना दाखविल्या जात आहेत. परदेशातील लोकप्रिय टॉक शोची नक्कल करून रिअॅलिटी शो आणले जात आहेत. मालिका या बुद्धी भ्रष्ट करण्याचे माध्यम बनत आहेत. या करमणुकींना वेळीच मर्यादा घातल्या नाहीतर संस्कृतीचे अध:पतन होण्यास वेळ लागणार नसल्याचे परखड मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित ‘सहचारिणी’ महिला विशेषांक आणि ‘रणरागिणी पुरस्कार’ वितरणाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास शिंदे, शिवराज घुले, शांताराम इंगवले, अमित कंधारे आणि स्मरणिकेच्या संपादिका वेणू शिंदे उपस्थित होत्या. या वेळी निकम यांच्या हस्ते डॉ. सुचिता फाळके, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता जाधव, विद्या बागल, हलिमा कुरेशी, सुजाता तापकीर आदी विविध क्षेत्रांतील महिलांना ‘रणरागिणी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. निकम म्हणाले, ‘‘स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कठोर कायदे झाले पाहिजेत, अशी मागणी होते. मात्र, याचा मुकाबला स्त्रियांनीच केला पाहिजे. यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. एकतर्फी प्रेम हा व्यवस्थेचा दोष की चित्रपट-मालिकांचा, असा प्रश्न शेवटी त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)४‘संस्कृती’ हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा पाया आहे. माणूस हा शिक्षणाने शिक्षित होतो; पण सुसंस्कृत नाही. त्यासाठी चांगल्या आचार-विचारांची गरज असते. स्त्री हे तर कुटुंबाचे बलस्थान मानले गेले आहे. चांगली पिढी घडविण्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. मात्र, स्त्री जबाबदारीची जाणीव पुरूष संस्कृतीला नसल्याची खंत निकम यांनी व्यक्त केली.
मालिकांतून संस्कृतीचे अध:पतन
By admin | Updated: March 26, 2015 00:22 IST