कारेगाव : मागील वर्षी दुष्काळ पडला होता; परंतु यंदा सर्वत्र जोमदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार आली आहेत. परंतु, कमी बाजारभावामुळे उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. नोटाबंदीनंतर सर्वच पिकांचे घसरलेले बाजार अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने शेतकरी धास्तावला आहे.शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. जे येतात तेसुद्धा जास्त मजुरी मागत असल्याने उत्पादनखर्च वाढत आहे. एखाद्या कंपनीत कामाला गेल्यास शेतात काम करण्यापेक्षा अधिक मजुरी मिळते. त्यामुळे मजूर कंपनीत जाणे पसंत करतात. त्यामुळे कोणत्याही पिकांचा उत्पादनखर्च वाढत आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदापीक घेतले जाते; परंतु मागील कित्येक वर्षांच्या सरासरीपेक्षा बाजारभाव या वर्षी मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. परिणामी, काही शेतकरी चक्क कांदा जाळत आहेत, तर काही भागात उभ्या पिकात जनावरे सोडली जात आहेत. अनेकदा बाजारात आणून माल खपत नसल्याने शेतकरी तो फेकून देणे पसंत करतात. चार ते पाच महिन्यांत कांदा निघत असल्याने बहुतांश जिरायत भागातील शेतकरी हे पीक घेतात. त्यामुळे पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. सध्या कांदा काढणीस आला आहे. परंतु, बाजारभाव नसल्याने शेतकरी तसाच कांदा ठेवत आहेत. त्याचा एकूणच ग्रामीण अर्थव्यवथेवर परिणाम होत आहे. तरकारी पिकांच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. मेथी, कोथिंबीर २-४ रुपये गड्डी जात असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागते. तर, कधी बाजारात व्यापारी माल घेत नसल्याने फेकून द्यावा लागत आहे. टोमॅटो व फ्लॉवरचे दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांनी चालू फडात जनावरे सोडली आहेत. तर, काही शेतकरी तसाच माल पडू देत आहेत. मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमी, तर यंदा बाजारभाव कमी असल्याने उत्पादन होऊनही पैसे हातात पडत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.पीककर्ज कसे फेडणार ?या वर्षी ऊस वगळता कोणत्याच पिकाला उत्पादनखर्च निघेल, असा बाजारभाव मिळाला नाही. उसाला चांगला बाजारभाव असूनही सरासरी उत्पादन कमी निघाल्याने पदरात मोजकेच पैसे पडले. त्यामुळे कोणत्याच पिकातून पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. हातात पुरेसे पैसे नसल्याने मुलामुलींची लग्ने कशी करायची, हा प्रश्न त्याला सतावत आहे. महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी तागादा लावला जात आहे. परंतु, हाती पैसे नसल्याने वीजबिल कसे भरायचे, असा पेच निर्माण झाला आहे.नोटाबंदीनंतर शेतमालाचे भाव वधारतील, असे वाटत होते; परंतु बहुतांश पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. त्यामुळे यंदा कोणत्याही पिकातून उत्पादनखर्च निघेल एवढे पैसे हाती लागले नाहीत. त्यामुळे पीककर्ज नवे-जुने तरी कसे करायचे? तसेच, केवळ आश्वासनावरच जगायचे का? शासन काही करणार आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. - शिवाजी डुबे, शेतकरी
घसरलेले बाजारभाव ‘जैसे थे’
By admin | Updated: February 23, 2017 02:19 IST