प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : पुणे-मुंबईतील अतिउत्साही लोक गाड्या घेऊन पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. राज्यभरात विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. आपल्या आंदोलनांमधला आक्रोश असो किंवा वर्षा सहलीचा आनंद असो...त्याच्याशी कोरोना विषाणूला काहीच देणे-घेणे नाही. तो आपल्यामधून गेलेला नाही. उलट ‘म्युटेशन’च्या रुपात आणखी धोकादायक रूपे दाखवू लागला आहे. विषाणूतील म्युटेशन, लसीकरण याबाबी नागरिकांच्या हातात नाहीत. पण, जबाबदारीने वागणे तर त्यांच्या हातात आहे. सध्याची गर्दी पाहता नागरिकच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. त्यांना बहुदा पुन्हा लॉकडाऊन हवा आहे. तिसरी लाट दोन-चार आठवडे अलीकडे आणायची की तीन महिने पुढे ढकलायची हे आता आपणच ठरवले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे माजी आरोग्य महासंचालक आणि महाराष्ट्र कोरोना कृती समितीचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी जनतेचे कान टोचले.
दुसरी लाट ओसरली आणि लगेचच लॉकडाऊनही शिथिल करण्यात आला. सध्या बस, हॉटेल, दुकाने, रस्ते, पर्यटनस्थळे अशा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी चिंतेत भर घालत आहे. पहिल्या लाटेनंतरचा नागरिकांचा गाफीलपणा आणि निष्काळजी वागणे दुसऱ्या लाटेनंतरही ‘जैसे थे’ आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील दोन-चार आठवड्यांमध्ये तिसरी लाट धडकू शकते, अशी शक्यता टास्क फोर्सकडून वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेला आपणच आमंत्रण देत आहोत, हे सांगण्यासाठी कोणत्याही डॉक्टर किंवा शास्त्रज्ञाची गरज नाही, असे परखड मत तज्ज्ञ वर्तवत आहेत.
सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी तसेच बस, हॉटेलांमधून पन्नास टक्के क्षमता उपस्थितीचा निर्णय सर्रास धुडकावला जात आहे. गर्दीमुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे. सध्याचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ आधीच्या विषाणूंपेक्षा झपाट्याने संसर्ग पसरवणारा आहे. लसीकरणाचा वेगही म्हणावा तितका वाढलेला नाही. कोरोना चाचण्या करून घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्वांची परिणती रुग्ण संख्या वाढण्यात होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
चौकट
विषाणूचे नवे ‘स्ट्रेन’ धोकादायक
“विषाणूचा नवीन स्ट्रेन तयार होतो आहे. तो जास्त धोकादायक आहे. १८ वर्षांखालील वर्गाला लस उपलब्ध नसल्याने त्यांना धोका आहेच; १८-४४ या वयोगटातील नागरिकांचेही पुरेसे लसीकरण झालेले नाही. त्यातच लॉकडाऊन उठल्यावर गर्दी होते आहे. एकूण सगळेच चित्र तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारे आहे. तिसरी लाट लवकर येईल हे सांगायला टास्क फोर्स, डॉक्टर, शास्त्रज्ञ कोणाचीही गरज नाही. सामान्य नागरिकालाही हे कळू शकते आणि ते टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक वर्तन करणेही त्यांच्याच हातात आहे.”
- डॉ. सुभाष साळुंखे, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य
चौकट
“आपल्याकडे सोशल डिस्टन्सिंग अजिबातच पाळले जात नाही. दोन लाटा येऊन गेल्यावरही सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी व्हायला तयार नाही. लॉकडाऊन उठल्यापासून लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. मास्क योग्य प्रकारे वापरला जात नाही. लोक घरगुती कपड्याचा मास्क वापरत आहेत. त्याचा काहीही उपयोग होत नाही, हे लोकांना समजावून सांगितले पाहिजे.”
- डॉ. अच्युत जोशी, कन्सलटिंग फिजिशियन