चेतन चव्हाण / इंदापूरइंदापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकणी असलेल्या ऐतिहासिक परंपरा लाभलेला ‘भार्गवराम बगीचा’ हा काही काळापूर्वी शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकत होता. परंतु आज या बगीचाकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने मूलभूत सोई-सुविधांचाबोजवारा उडाला आहे. इंदापूर शहरातील तसेच आसपासच्या गावातील नागरिक या बगीच्यात विरंगुळ्यासाठी येत असतात. या बगीच्यात आजच्या घडीला कोणत्याही प्राथमिक सुविधा, पाण्याची, शौचालयाची, बसण्याची व इतर सुविधा नसल्यामुळे लोकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. बसण्यासाठी बाकडे मोडकळीस आली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या चोरीस गेल्या आहेत. महिलांसाठी व पुरुषांसाठी या बागेत आजपर्यंत स्वच्छतागृह नाही. सध्या बागेतील झाडांच्या पानांची गळती झाली असून झाडांचा पालापाचोळा बागेत जाळला जात आहे व त्याचा धूर संपूर्ण बागेत पसरत आहे. त्या धुराचा त्रास बागेत आलेल्या नागरिक व आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना होत असल्याचे दिसून आले आहे. बागेतील काही झाडेही अज्ञातांनी तोडली असल्याचे निदर्शनास आले. बागेतील विद्युत पंपाचा रोहित्र उघडा असून व लहान मुलांचा सहज हात लागेल, अशाच स्थितीत आहे. लहान मुलांच्या खेळण्यासाठी असणाऱ्या साहित्याची मोडतोड व काही साहित्य चोरीस गेल्याचेही निदर्शनास आले आहे. बागेत असणारा कारंजाही मोडकळीस आला आहे. तीन वर्षांपासून तो बंद आहे. दिवे असून नसल्यासारखेच आहेत. हे दिवेही तीन वर्षांपासून बंद आहेत. रात्री-अपरात्री अंधाराचा फायदा घेऊन या बगीच्यात अवैध धंद्यांना उधाण येत आहे. या बागेच्या आवारात छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाचे काम चालू असून तीन महिन्यांपासून हे काम बंद आहे. अर्धवट झालेल्या स्मारकावर जुगार खेळले जात आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले, की येथे लवकरच प्राथमिक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
मूलभूत सुविधांचा बोजवारा
By admin | Updated: March 24, 2017 03:58 IST