पिंपरी : पूर्ववैमनस्यातून आठ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केलेल्या गौरव तुळशीराम साठे (वय २०, रा. पंचतारानगर, आकुर्डी) याचा शुक्रवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या एका खूनप्रकरणात तो आरोपी होता. येरवडा कारागृहातून तो नुकताच जामीनावर बाहेर आला होता. कासिम शेख ऊर्फ काश्या, साहिल जगताप ऊर्फ खारया, विजय जगताप ऊर्फ नाना, तानाजी जगताप, अनिकेत ऊर्फ विकी पैठणकर, निखिल भालेराव, सलीम ऊर्फ सलम्या, करण भेगडे (सर्व रा. आकुर्डी) अशी खुनाचा गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेली माहिती अशी : १ जानेवारी २०१४ ला कासिम शेख याचा भाऊ सुलेमान याचा खून झाला. या प्रकरणात गौरव साठे होता. त्याचा राग कासिमच्या मनात होता. दरम्यान, रविवारी रात्री नऊच्या सुमारास आकुर्डी, दत्तवाडी येथील सोनिगरा क्लासिक बिल्डिंग येथून गौरव जात असताना आठ जणांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. लाकडी दांडक्याने मारहाण करीत तलवारीने वार केले.यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्वजण फरार झाले आहेत.(प्रतिनिधी)
जामिनावर सुटलेल्या जखमी तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: September 23, 2014 06:55 IST