पुणे : कडकनाथ कोंबड्या चोरून नेल्याच्या गैरसमजातून एका ४० वर्षीय नागरिकाच्या खुनाचा प्रयत्न करणार्या सराईतासह त्याच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली. सचिन मारूती खैरे (वय २७), शिवम सूरज सरोज (परदेशी) (वय १९, दोघेही रा. दत्तनगर, रामनगर, वारजे माळवाडी) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
२ एप्रिल रोजी दत्तनगर परिसरातील युवराज मित्र मंडळाच्या शेडजवळ हा प्रकार घडला. याबाबत, संदीप नथुराम खैरे (वय ४०, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. खैरे हा रेकॉर्डवरील तडीपार आरोपी असून, त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार असतानाही त्याने शहरात येत साथीदारांच्या मदतीने गंभीर गुन्हा केला असल्याने गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. अटक आरोपींसह एका अल्पवयीन व अन्य एका विरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.