बेल्हा : चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी पती पत्नीचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील साकोरी शिवारातील पानसरेमळा येथे उघडकीस आली. ही घटना शनिवारी (दि. २७) उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर भीमाजी पानसरे (वय ४२), संगीता शंकर पानसरे (वय ३७) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.साकोरीच्या पानसरेमळा येथील बंद घराच्या बाहेर शनिवारी ११ च्यादरम्यान बंद घरालगतच्या शेतात कपडे, पेटी आदी वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या ग्रामस्थांना दिसल्या. यानंतर त्यांनी एका कोपऱ्याच्या भिंतीतून आतमध्ये पाहिले असता त्यांना घरात संगीता पानसरे यांचा मृतदेह व शेजारी दुचाकी दिसली. तसेच दुर्गंधीचा वासही त्यांना येऊ लागल्याने त्यांनी आळेफाटा पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये पाहणी केली असता संबंधित दाम्पत्याचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. मृतदेहाच्या बाजूला कुऱ्हाड आढळून आली. चोरीच्या उद्देशाने घरात घुसून चोरट्यांनी या दाम्पत्याचा कुऱ्हाडीच्या सहाय्याने खून करून दरवाजाला बाहेरून कुलूप लावून शेतात वस्तू अस्ताव्यस्त करीत पोबारा केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत दादाभाऊ भीमाजी पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी चोरट्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत. तपासासाठी पथकाची स्थापनाया घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनीही तपासाविषयी सूचना केल्या. दुपारनंतर श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी सायंकाळच्या सुमारास दाखल झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधवही सायंकाळी घटनास्थळी आले आहेत. तपासाच्या दृष्टीने दोन पथके परिसरात तसेच इतर ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. याच परिसरात गुरुवारीही इतर ठिकाणीही भुरट्या चोऱ्या झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्याचा निर्घृण खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साकोरी येथे दाम्पत्याचा खून
By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST