नेहरूनगर : शाळेपासून सव्वाशे किलोमीटर दूर अंतरावर स्थलांतर झालेल्या अनेक कुटुंबातील शाळेपासून वंचित असलेल्या ४२ शालाबाह्य मुलांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटवून त्यांच्या अंधारमय जीवनात प्रकाश टाकण्याचे काम शिक्षकांनी केले.अहमदनगर जिल्ह्यातील वांगदरी या गावातील नंदीवाले समाजातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात शहरातील नेहरूनगर येथील एचए मैदान येथे स्थलांतरित झाली आहेत. ४२ विद्यार्थी शाळेपासून दूर झाल्यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधारी झाले होते. अनेक मुले शालाबाह्य झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ४२ विद्यार्थी शाळेमध्ये येत नसल्याचे मुख्याध्यापिका हिराबाई हिंगडे यांच्या लक्षात आल्यानंतर सहशिक्षक राम पवार, आबा गोरडे, हरिचंद्र ढेरे, संतोष भालेराव हे सर्व शिक्षक त्या मुलांचा शोध घेत नेहरूनगर येथील एचए मैदान येथे दाखल झाल्या. त्यांना या ठिकाणी अनेक झोपड्या आढळून आल्या. त्यांनी प्रत्येक झोपडीत जाऊन मुलांचा शोध घेतला असता, या ठिकाणी शाळेपासून दूर झालेले अनेक विद्यार्थी या ठिकाणी सापडले.पालकांनी सहमती दर्शविल्यानंतर मुख्याध्यापिका हिंगणे यांनी या झोपडीतील १६ मुलगे व १८ मुलींना घेऊन नेहरूनगर परिसरातील महापालिकेच्या मुले क्रमांक १ व २ व मुलींच्या शाळेत त्यांना घेऊन जाऊन या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संबंधित मुख्याध्यापकांना सांगितली. शालाबाह्य मुलांना प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला. तसेच पालकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. (वार्ताहर)
अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय
By admin | Updated: November 16, 2016 02:27 IST