पुणे : भरतनाट्यम् आणि ओडिसी नृत्याच्या सुंदर मिलाफ, अनुरूप संगीत, अप्रतिम प्रकाश आणि ध्वनी योजनेचा सुंदर मिलाफ यंतून शिवदर्शन घडले. ऐतिहासिक शनिवारवाड्यात झालेल्या सादरीकरणाने रसिक स्तिमित झाले. शनिवारवाडा येथे बुधवारी नृत्य आणि संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे पेट्रन जॅकी श्रॉफ तसेच सबीना संघवी, प्रभा पटवर्धन, मनीषा साठे, रेखा कृष्णन, पारूल मेहता, झेन्सार कंपनीचे बाला उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नृत्यांगना उमा घोडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेशवंदना सादर केली. त्यानंतर संकीर्तन कार्यक्रमात संत गोरा कुंभार, जनाबाई, सावता माळी, कान्होपात्रा या संतांच्या रचनांवर रचलेल्या अभंग व कीर्तनावर ‘विठ्ठल- विठ्ठल’च्या गजरात नृत्य सादरीकरण झाले. संकीर्तन कार्यक्रमाच्या अखेरीस पसायदानातील प्रत्येक ओवीचा अर्थ समजावून सांगणाऱ्या मुद्रांच्या माध्यमातून अनोखा नृत्याविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. मृण्मयी पाठक व सौरभ कडगावकर यांनी अत्यंत सुरेल संगीताची साथ, तर अमित काकडे यांनी सितार, सुभाष देशपांडे यांनी पखवाज व उदय देशपांडे यांनी तबल्यावर साथसंगत केली. डॉ. संध्या पुरेचा व ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांनी शिवशंकर ही नृत्यनाटिका सादर केली. याशिवाय, शिवाचे तांडवनृत्य, मदनदहन आणि वसंत ॠतूचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी)
नृत्यातून घडले शिवदर्शन!
By admin | Updated: March 20, 2015 01:03 IST