- नीलेश राऊत पुणे : महाराष्ट्रातील हजारो एकर जमिनी पाण्यावाचून पडीक राहतात किंवा पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे उभी पिके जळतात. मात्र याच महाराष्ट्रात पाण्याच्या अतिरेकामुळे हजारो एकर शेतजमिनींची नासाडी झाली असून सध्या त्या क्षारपड म्हणून दुर्लक्षित आहेत़. या जमिनी लोकसहभागातून उत्पादनक्षम व सुपिक बनविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ' यशदा' च्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. शिरुर (जि. पुणे) येथे सुरु असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाने यशाचे शिखर गाठले आहे़. निर्लवण २०२० या क्षारपड जमीन पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत क्षारपड शेतजमीन आजमितीला कोरडी होऊन पुन्हा लागवडीसाठी तयार झाली आहे़. विशेष म्हणजे वाया गेलेल्या क्षेत्रापैकी ५० टक्के जमीन लागवडीखाली आली. यातली ३० टक्के जमिनीवर यंदाच्या खरिप हंगामात पिकेही बहरली आहे़. पाण्याच्या अतिवापराने खराब झालेल्या या जमिनींवर गेल्या वीस वर्षांपासून कोणतीही पिके घेतली जात नव्हती.शिरूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या खोऱ्यात तांदळी, गणेगाव धुमाळ या गावातली दोन हजार क्षारपड जमीन यशदाच्या जलसाक्षरता केंद्राने अभ्यासाला घेतली़. केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ़ सुमंत पांडे व त्यांच्या टिमने जानेवारी २०१८ पासून जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करुन जमीन, पाणी, माती व तत्सम बाबींच्या वस्तुस्थितीची जाणीव स्थानिक शेतकऱ्यांना करून दिली़ दुथडी भरलेल्या नदीपासून अवघ्या सात-आठ किलोमीटर परिसरातली ही जमीन क्षारपड कशाने झाली. याची कारणे सप्रमाण दाखवून देण्यात आली. यानंतर लोकजागृती झाली आणि शासनाचा एकही पैसा न घेता केवळ लोकसहभागातून कामाला सुरुवात झाली.
.........राज्यातली क्षारपड जमीन सुमारे ६ लाख हेक्टर राज्य कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातली ६़०७ लाख हेक्टर शेतजमिन क्षारपड आहे़. भीमा, कृष्णा व गोदावरीच्या खोऱ्यात क्षारपड क्षेत्र सर्वाधिक आहे़. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यात तर विदभार्तील अकोला, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये क्षारपड जमीनीचे प्रमाण जास्त आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण अधिक आहे़. कोकणात समुद्राच्या पाण्यामुळे जमिनी अतिआम्लयुक्त झाल्या आहेत़. ...............लोकसहभागाचे आवाहन पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असलेले तालुके एकीकडे आणि दुसरीकडे पाण्याच्या अतिवापरामुळे नापीक होऊ लागलेला तालुके, असे विरोधाभासी चित्र महाराष्ट्रात आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने लाखो हेक्टर जमिन क्षारपड झाली आहे़ याकडे गेली कित्येक दशके दुर्लक्ष करून केवळ निसगार्ला दोष देत अनेकांनी या जमिनी ओस ठेवल्या आणि मोलमजुरीचा मार्ग स्विकारला़. या सर्वांकरीता पुण्यातील यशदा येथील जलसाक्षरता केंद्राने आशेचा नवा किरण दाखवला आहे़. जमिनी क्षारपड होण्याच्या कारणांची जाणीव करुन देत, संबंधितांच्याच लोकसहभागातून, सरकारी अनुदानशिवाय हजारो एकर जमिनी सुपिकतेच्या मार्गावर आणण्याचे प्रबोधन या केंद्राच्यावतीने केले जात आहे.