राजगुरुनगर : सावरगाव (ता. जुन्नर) येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलतीचा खून करणाऱ्या आरोपीला राजगुरुनगर येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली.संजय मारुती जाधव (वय ४० वर्षे, रा. शिवहरिनगर, सावरगाव, ता. जुन्नर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, १८ सप्टेंबर २०१४ मध्ये ही घटना घडली होती. विमल दामोदर जाधव (वय ५६ वर्षे) असे यामध्ये मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी आणि मयत व्यक्ती यांची कुटुंबे शेजारीच राहत असून, त्यांच्यामध्ये जमिनीसंदर्भात मोठा वाद होता. घटनेच्या दिवशी सकाळी सहा वाजता मयत विमल या प्रात:विधीसाठी घराबाहेर जात असतानाच आरोपीने त्यांना अंगणातच गाठले. आरडाओरडा ऐकून त्यांचे पती दामोदर रामभाऊ जाधव हेही बाहेर आले. त्या वेळी आरोपी मयत विमल यांचे केस धरून कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करीत होता. दामोदर हे पत्नीची सोडवणूक करण्यासाठी पुढे गेले असता, त्यांच्यावरही आरोपी संजयने कु ऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेतच दामोदर हे बाजूच्या वस्तीवर पळत गेले आणि स्वत:चा जीव वाचवला. तोपर्यंत पत्नी विमल अंगणामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्या होत्या. शेजाऱ्यांनी घाईघाईने विमल यांना उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये व नंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विमल यांच्या पतीने जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीला अटक केली. राजगुरुनगर न्यायालयामध्ये न्या. जगताप यांच्यापुढे सुनावणीसाठी हा खटला आल्यानंतर आरोपीच्या विरोधामध्ये मयताचे पती व फिर्यादी दामोदर जाधव व शेजारी असलेल्या सातजणांची साक्ष सरकारी पक्षातर्फे तपासली. या सर्वांची साक्ष ग्राह्य धरून न्या. जगताप यांनी आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, गंभीर जखमी केल्यावरुन एक वर्षाची शिक्षा व ५००रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.अरुण ढमाले यांनी काम पाहिले. स. पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोलीस काँस्टेबल एस.एन.देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
चुलतीचा खून; पुतण्याला जन्मठेप
By admin | Updated: February 17, 2017 04:38 IST