पुणे : नागरी समस्या सोडविण्याबरोबरच नगरसेवकांनी स्थानिक भागातील गरजा ओळखून त्यावर काम करावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली़
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या पेहेलवान जीमचे उद्घाटन पाटील यांच्याहस्ते केले़ यावेळी खासदार गिरीष बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनित जोशी, पेहेलवान जीमचे संचालक सागर धारिया, पेहेलवान जीमची संकल्पना मांडणारे नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर उपस्थित होते़
पाटील म्हणाले, नगरसेवकांनी आपण एका प्रभागाचे नगरसेवक आहोत ही भावना न ठेवता, संपूर्ण शहराचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे़ रस्ते,गटर यात न अडकता शहराची काय आवश्यकता आहे ती पूर्ण करणे ही नगरसेवकांकडून नागरिकांची अपेक्षा असते़ ती पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत़
कोरोना आपत्तीमुळे धनसंपदेपेक्षा शरिरसंपदा महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले आहे़ सुसज्ज व्यायामशाळा ही आज गरज निर्माण झाली असून पुरूषांबरोबरच महिलांनाही व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही पाटील म्हणाले़
एका प्रभागातील चार नगरसेवक एकत्र आल्यावर किती चांगले काम होते़ याचे उत्तम उदाहरण या पेहेलवान जीमच्या माध्यमातून व पोटे यांच्या प्रभागातून दिसून येत असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले़ आपल्या प्रास्ताविकपर भाषणात दीपक पोटे यांनी पेहेलवान जीम मागील संकल्पना विशष करून, ही जीम प्रति दिन दहा रूपये शुल्काने उपलब्ध होणार असल्याचे सांगितले़
--
चौकट
बापट असल्यामुळे पट काढायचे माहिती
कुस्ती ही केवळ शक्तीवर नाही तर युक्तीवर जिंकता येते़ बापट असल्यामुळे समोरच्याचा पट कसा काढायचा हे मला चांगले महित आहे, असे सांगत मी काहीही बोललो तरी मागचा पुढचा संदर्भ काढून त्याच वाक्याची चर्चा होते, असे सांगून बापट यांनी, चंद्रकांत पाटील यांची कुस्ती ही राज्यातील सर्व काँग्रेसवाल्यांशी असल्याचे सांगितले़