पुणे : शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सरासरी १२ ते १६ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यापैकी २००० चाचण्या ससून सर्वोपचार रुग्णालयात, तर १०० चाचण्या आयसर संस्थेत होत आहेत. महापालिकेतर्फे साधारपणे १७५० आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या केल्या जातात. याचाच अर्थ १० हजार चाचण्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जात आहेत. एका चाचणीसाठी ९२० रुपये इतका खर्च येतो. याचाच अर्थ पुणेकरांचे दररोज तब्बल १ कोटी रुपये कोरोना चाचण्यांवर खर्च होत आहेत. त्यामुळेच, शासकीय प्रयोगशाळांमधील चाचण्यांची क्षमता वाढावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मार्च महिन्यात प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चाक गाठलेला पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. रुग्णांची एका दिवसाची संख्या २०००-२१०० इतकी होती. त्यावेळी शहरात दर दिवशी ६०००-७००० चाचण्या होत होत्या. मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने आली आहे. दररोजची रुग्णसंख्या ३ हजारांचा टप्पा ओलांडत आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या १६ हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, पुण्यामध्ये ८ शासकीय प्रयोगशाळा तर १२ खाजगी प्रयोगशाळांना कोरोना चाचण्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ३-४ शासकीय प्रयोगशाळांमध्येच सध्या चाचण्या होत आहेत. शहरात दररोज २५००-३००० चाचण्या शासकीय प्रयोगशाळा किंवा रुग्णालयांमध्ये केल्या जातात. उर्वरित सर्व चाचण्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये होतात. एका आरटीपीसीआर चाचणीचा खर्च ९२० रुपये ते ९५० रुपये इतका आहे. सर्वच स्तरातील नागरिकांना इतका खर्च परवडणारा नसतो. १६ हजार चाचण्यांपैकी १२ हजार चाचण्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये होत असतील तरी एकूण खर्चाची रक्कम एक ते सव्वा कोटी इतका होतो. त्यामुळेच शासकीय प्रयोगशाळांमधील चाचण्यांची संख्या वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----
सात दिवसांत ६२ हजार चाचण्या
११ मार्च ते १७ मार्च या कालावधीत पुणे महापालिका हद्दीत एकूण ६२,५७९ इतक्या चाचण्या झाल्या. त्यापैकी १२,२७६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. १८ मार्च ते २४ मार्च या काळात ७०,००० चाचण्या झाल्या. त्यापैकी २०५४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.