लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्व प्रशासकीय यंत्रणांना राज्य शासनाने अधिकाधिक संशयितांची तपासणी करून कोरोनाबाधितांना विलग करण्यासाठी अधिकचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास सांगितले आहे़ मात्र, पुण्यात महापालिकेची क्षमता दिवसाला केवळ १ हजार २५० जणांचे स्वॅब ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी पाठविण्याची आहे़ त्यामुळे पुणे शहरातील कोरोना चाचणीची भिस्त शहरातील खासगी प्रयोगशाळांवर (लॅब) अधिक असल्याचे समोर आले आहे़
पुणे महापालिका हद्दीत दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे़ अशावेळी महापालिकेच्या यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये शेकडो जण दररोज प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सापडत आहेत़ परंतु, महापालिकेच्या सर्व कोरोना चाचणी (स्वॅब कलेक्शन सेंटर) केंद्राच्या ठिकाणी मर्यादितच स्वॅब घेतले जात आहेत़ या सर्व ठिकाणी दिवसाला ‘आरटीपीसीआर’करिता १ हजार २५० तर, अॅण्टीजेन किटव्दारे अडीचशे ते तीनशे स्वॅब तपासले जातात़ यामुळे दिवसाला महापालिकेकडून सर्व मिळून साधारणत: पंधराशेच चाचण्या होत आहेत़
कोरोनाबाधितांची शहरातील संख्या कमी झाल्याने ‘एनआयव्ही’ने, पुणे महापालिकेला चाचणीसाठी स्वॅब पाठविण्याची मर्यादा एक हजाराहून कमी करून केवळ शंभरवर आणली होती, ती आजही कायम आहे़ तर ‘आयसर’ कडून ही मर्यादाही दीडशेवर आणण्यात आली आहे़ दरम्यान, ससून रुग्णालयातील यंत्रणेने महापालिकेला चाचणीसाठी मोठा आधार दिला असून, येथे एक हजार स्वॅब महापालिका दररोज तपासणीसाठी पाठवत आहे़
दिवसेंदिवस शहरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता, महापालिकेकडील चाचणी क्षमता वाढविणे गरजेचे आहे़ पण आजमितीला शहरातील ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’व्दारे (आयसीएमआर) मान्यता असलेल्या २० खासगी प्रयोगशाळांकडून मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत आहेत़ मात्र, जिल्हा प्रशासनासह राज्य शासनानेही याकडे विशेष लक्ष दिलेले दिसून येत नाही़
--------------------------------------------------------