कोरोनामुक्त रुग्णांना होतोय बुरशीजन्य आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:38+5:302021-05-06T04:10:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुक्त रुग्णांमध्ये सध्या ‘म्युकोर्मायकॉसिस’या बुरशीजन्य रोगाचा धोका वाढत आहे. दात हलणे, दुखणे, पू येणे, ...

Corona-free patients develop fungal diseases | कोरोनामुक्त रुग्णांना होतोय बुरशीजन्य आजार

कोरोनामुक्त रुग्णांना होतोय बुरशीजन्य आजार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुक्त रुग्णांमध्ये सध्या ‘म्युकोर्मायकॉसिस’या बुरशीजन्य रोगाचा धोका वाढत आहे. दात हलणे, दुखणे, पू येणे, फोड येणे, वास येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी येणे, डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे काहींना वरचा जबडा, डोळा देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णांच्या तोंडाचा एक्सरे काढावा, असा सल्ला एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे मॅक्सिलोफेशियल विभागप्रमुख दंतशल्यचिकित्सक डॉ. जे. बी. गार्डे यांनी दिला आहे.

डॉ. गार्डे म्हणाले की, पुण्यात विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये या आजाराचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले असून कोरोनानंतर या बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे. वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टी यांवर परिणाम होऊन काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे. सरकारने या संसर्गाची दखल घेऊन एस.ओ.पी. तयार केली पाहिजे.

कोरोना रुग्णांना म्युकोर्मायकॉसिस वाचवण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असून फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सीलोफेशियल सर्जन (मुखशल्य चिकित्सक) नाक-कान-घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान-उपचार-पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात दंत शल्यचिकित्सक महत्त्वाचे योगदान देऊन रुग्णाचा प्राण वाचवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

----

‘म्युकोर्मायकॉसिस’ची बाधा कशी होते?

ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना या बुरशीची लागण होत नाही. परंतु, अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, एड्स असणाऱ्यांना, तसेच स्टिरॉईडस्, सायक्लोस्पोरिन ही प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरणारी औषधे घेणाऱ्यांना हा आजार पटकन लक्ष्य बनवतो. दूषित मास्क, ऑक्सिजनच्या अस्वच्छ नळ्यातून बुरशीचे तंतू नाका-तोंडात शिरकाव करू शकतो. सायनसमध्ये ठाण मांडून बसतात. हवेतील बुरशीमुळेही संसर्ग होतो. तसेच कोरोनातून बरे होऊन घरी आल्यावर कोणताही बुरशीजन्य पदार्थ, शिळे अन्न, फर्निचर किंवा पुस्तकांवरची धूळ यांपासून दूर राहा.

‘म्युकोर्मायकॉसिस’वर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.

म्युकोर्मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. वेळेवर निदान, शास्त्रशुद्ध उपचार, पुनर्वसन तिन्ही टप्प्यात हे सर्व डॉक्टर यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

Web Title: Corona-free patients develop fungal diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.