पुणे : शहरातील कचराप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थ आणि पालिकेतील अधिकारी यांची ५0 वर्षे एक समन्वय समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असून, त्याच्या अध्यक्षपदी पालकमंत्री असणार आहेत. या समितीच्या रचनेसाठी तसेच शहरात निर्माण होत असलेल्या कचऱ्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज बैठक घेतली. या वेळी ही समिती निश्चित करण्यात आली. उरुळी, फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोत कचरा टाकण्यास विरोध करत १ जानेवारीपासून आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून नवीन प्रकल्प आणि इतर जागा मिळविण्यासाठी नऊ महिन्यांची मुदत द्यावी, अशी विनंती ग्रामस्थांना केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी काही अटींवर ही मान्यता दिली आहे. प्रत्येक महिन्यात कचराडेपोत किती कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार, याची माहिती एक महिना अगोदरच प्रशासनाने जाहीर करावी. तसेच, या गावांमध्ये एका महिन्यात विकासाची कोणती कामे होणार, या दोन्ही बाबींची माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतरच पुढील महिन्यातील कचरा टाकण्याची मान्यता द्यावी, असे या बैठकीत ठरले आहे. यावर देखरेख करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेतील अधिकारी आणि ग्रामस्थ यांचा समावेश असलेली एक समिती तयार केली जाणार आहे.या समितीत पालकमंत्री, स्थानिक आमदार, राज्यमंत्री, दोन ग्रामस्थ, महापौर, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा पदाधिकारी असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ओला आणि सुका असा वर्गीकरण करूनच कचरा स्वीकारला जात आहे. यामुळे नक्की काय फायदा झाला. शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते. सुक्या कचऱ्याचे काय केले जाते, याबाबतची माहिती घेऊन पालकमंत्र्यांनी आढावा घेतला असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कचरा व्यवस्थापनासाठी समन्वय समिती
By admin | Updated: January 13, 2015 05:47 IST