चिंचवड : प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीवेळी राष्ट्रवादी व भाजपाच्या उमेदवारांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यानंतर बाहेर थांबलेले दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यामुळे निवडणूक कार्यालयाजवळ गोंधळ उडाला. अधिका-यांनाही आरेरावी करण्यात आली. मात्र, पोलिसांकडे कोणीही तक्रार केली नाही.उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरूझाली. प्रथम प्रभाग क्रमांक १८ च्या उमेदवारांच्या छाननीचे काम सुरू झाले. या वेळी कार्यालयाबाहेर गर्दी वाढत गेली. दुपारी एकला प्रभाग क्रमांक १९ अ च्या उमेदवारांना कार्यालयात बोलावण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळुराम पवार, आरपीआयचे नितीन गवळी, भाजपाचे नेताजी शिंदे, शैलेश मोरे यांच्यासह इतर पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारही कार्यालयात गेले.भाजपाच्या वतीने या गटात नेताजी शिंदे व शैलेश मोरे या दोन्ही इच्छुकांना एबी फॉर्म दिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली आवले यांनी सांगितले. मात्र मोरे यांनी नामनिर्देशनअर्ज शिंदे यांच्या आधी भरला असल्याने मोरे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिंदे, पवार व गवळी यांनी या निर्णयावर खुलासा करण्याची मागणी अधिका-यांकडे केली. त्या वेळी मोरे यांनी पवार यांना हटकले. त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. आतमध्ये झालेला प्रकार बाहेर कार्यकर्त्यांना समजल्यावर भाजपा व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटांत मारामारी सुरू झाली. या वेळी पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकार थांबविला. (वार्ताहर)
वादावादी अन् मारामारी!
By admin | Updated: February 5, 2017 03:33 IST