लोणावळा : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर खंडाळा एक्झिटजवळ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अपघात झाला. या अपघातप्रकरणी आर. आर. रोडवेज कंपनीच्या ट्रेलरचालकाविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रेलरने (एमएच ४३-एआर ०४६४) समोरून जाणाऱ्या चार वाहनांना धडक दिली. नंतर दुभाजक तोडून विरुद्ध लेनवरील मोटारीला धडक दिली. या वेळी झालेल्या अपघातात डी. एस. कुलकर्णी यांच्या मोटारीचा चालक नीरज रामकरण सिंग (वय ३७, रा. गणेशनगर, बोपखेल) जागीच ठार झाला. मोटारीत मागे बसलेले डी. एस. कुलकर्णी आणि चालकाशेजारील आसनावर बसलेले किरण काटे हे जखमी झाले. परंतु, पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने निगडीतील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रेलरचालक पसार झाला होता. मात्र, ४४ किलोमीटरवर खालापूरजवळ ट्रेलर लॉक झाला. त्यामुळे ट्रेलर तेथेच सोडून चालक पळून गेला. त्याचे नाव समजू शकले नाही.
कंटेनरचालकावर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 27, 2016 04:49 IST