पुणे : महानगरपालिकेच्या अवाढव्य मतदारसंघांमुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असून ‘मिनी आमदार’ होण्याच्या प्रयत्नांत असलेल्या उमेदवारांनी आपले आप्त, मित्र, सगेसोयरे अशा गोतावळ्याला प्रचारकार्यात सामावून घेतले आहे. उमेदवारांऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून जात हे आप्त आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत.शहरासह उपनगरांमध्ये उंच इमारतींची संख्या मोठी आहे. त्यातच वॉर्ड पद्धतीऐवजी प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने उमेदवारांना घरोघर पोहोचणे जिकीरीचे झाले आहे. उमेदवारी निश्चिती होण्यापूर्वी ज्यांना तिकिटाची खात्री होती, अशा काही उमेदवारांनी सोसायट्या, बंगले, रो हाऊस अशा भागांसह वाडे, चाळी, झोपडपट्ट्या अशा वस्त्यांमध्ये एक ते दोन वेळा धावत्या भेटी दिल्या. त्यामुळे आपल्या भागात कोण उमेदवार असू शकतील, याचा अंदाज मतदारांना बांधता आला. ज्या प्रभागांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी निश्चिती झाली नाही, त्या ठिकाणी मतदारांमध्येही उमेदवारांविषयी संदिग्धता होती.उमेदवारी निश्चित होण्याच्या कालावधीपासून मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत १२ दिवस प्रत्यक्ष प्रचारासाठी हाती होते. प्रचारासाठी ७ दिवसांचा अवधी उरल्याने उमेदवारांची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू आहे. आजच्या रविवारी सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचाराची धांदल दिसून येत होती. विविध सोसायट्यांमध्ये मतदारांना एकत्र करून उमेदवार किंवा त्यांचे आप्त प्रचार करताना दिसून आले. सख्ख्या भावाची, मुलाची, चुलतभावाची, मुलीची, पतीची, पत्नीची किंवा अन्य आप्तांची अशा प्रचारकार्यात मदत घेतली जात असून प्रभागातील एका पक्षाचे उमेदवार किंवा त्यांचे आप्त एकत्रित प्रचारासाठी जाताना दिसत आहेत. पत्रके वाटण्यासाठी महिला कार्यकर्त्यांचा आधार घेतला जात आहे. सोसायट्यांच्या अध्यक्ष, सेक्रेटरींना किंवा परिचितांना नागरिकांची एकत्रित बैठक बोलाविण्याची विनंती उमेदवार करत आहेत. आदल्या दिवशी किंवा ऐनवेळी गोतावळ्याचे अशा वेगवेगळ्या फळ्यांमध्ये प्रचारासाठी नियोजन केले जात आहे. सोसायट्यांमधील मतदारांचे मोबाईल क्रमांक एकत्रित करून देण्याची विनंती केली जात आहे. प्रचार अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर उमेदवारांच्या आवाजात मतदारांना साद घातली जाईल.
गोतावळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क
By admin | Updated: February 13, 2017 02:20 IST