पुणे : तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत असले, तरी भारतात अजूनही ३३ टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात १०० टक्के वीजनिर्मितीची आवश्यकता आहे. यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानात बदल आणि संशोधन या बाबींचा एकत्रित विचार होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. जी. गायकर यांनी व्यक्त केले.दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स, पुणे केंद्राच्या वतीने भरवण्यात आलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सचे ३२ वे राष्ट्रीय अधिवेशन आणि ‘भारतीय विद्युत ऊर्जाक्षेत्रातील पुढील दशकातील शाश्वत प्रगतीची दिशा’ या चर्चासत्राचे उद्घाटन गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षपदी आयइआयचे ए. एस. सतीश होते. महाराष्ट्र विद्युत मंडळाचे माजी तांत्रिक सभासद एस. व्ही. देव, पुणे केंद्राचे अध्यक्ष विजय घोगरे, डॉ. डी. जी. डोके, मानद सचिव व. ना. शिंदे आणि डॉ. व्ही. पी. नेरकर उपस्थित होते.गायकर म्हणाले, की ग्रामीण भागातील गरजा ओळखून आपले तंत्रज्ञान स्वयंपूर्ण झाले पाहिजे. तंत्रज्ञान आयात करण्यापेक्षा देशामध्ये त्याचे उत्पादन कमी खर्चात शक्य आहे. आता अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देऊन उद्योगांना पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे. शिक्षणाचा संबंध उद्योगाच्या गरजा व सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी थेट जोडला गेला पाहिजे.’’(प्रतिनिधी)
तंत्रज्ञान व संशोधनाचा एकत्रित विचार व्हावा
By admin | Updated: November 16, 2016 03:20 IST