लोकमत न्यूज नेटवर्कभोर : उत्रौली (ता. भोर) येथे औद्योगिक वसाहत, तर भोर शहरात भोरेश्वर औद्योगिक वसाहतीत मिनी औद्योगिक वसाहत करण्यासाठी तालुक्यातील तरुणांना विश्वासात घेऊन प्रयत्न करणार असून वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ; मात्र त्यासाठी तालुक्यातील विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.राजगड ज्ञानपीठाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, सुमंत शेटे, राजेश काळे, दिलीप बाठे, के. डी. सोनवणे, राजकुमार शिंदे, जगदीश गुजराथी, उत्तम थोपटे, प्रमोद थोपटे, बापू शिरवले, मदन खुटवड, सुभाष कोंढाळकर, बाळासोा शिंदे, सुवर्णा मळेकर, गीतांजली शेटे अनिल सावले, शिरीष चव्हाण, पोपट सुके, गजानन शेटे, धनंजय वाडकर, विकास कोंडे, नाना वीर, संजय मळेकर, सुनील थोपटे, पप्पू कंक व मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.थोपटे म्हणाले, की भोर शहरातील भोरेश्वर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी होण्यासाठी शासनस्तरावर सर्व बाबींची पूर्तता होऊन एमआयडीसी मंजूर झाली होती. मात्र, काही लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे मिनी औद्योगिक वसाहत होऊ शकली नाही. तसेच, १९९२मध्ये तालुक्यातील उत्रौली येथे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी ८०० एकर जागेवर एमआयडीसी प्रस्तावित केली होती. त्याचे पाणी, रस्ते वीज सर्व बाबींचे नकाशे, अंदाजपत्रक तयार केले असून ७/१२ वर नोंदी केल्या आहेत आणि औद्योगिक वसाहत व्हावी, म्हणून वेळोवेळी पाठपुरावाही केला. मात्र, दोन्ही ठिकाणी काही स्वार्थी लोकांमुळे औद्योगिक वसाहती होऊ शकल्या नाहीत. औद्योगिक वसाहत व महा ऊर्जा प्रकल्पाला विरोध केला म्हणून लोकांची दिशाभूल करीत आहेत, हे सत्य समोर आलेच पहिजे. भोर तालुक्यात औद्योगिक वसाहत करावी, यासाठी सर्व पक्षांच्या तरुणांना एकत्र करून वसाहतींबाबत दिशा ठरविण्यासाठी १४ मे रोजी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
औद्योगिक वसाहतीसाठी एकत्र यावे
By admin | Updated: May 11, 2017 04:18 IST