लोणी धामणी : खेड, आंबेगाव, शिरूर, नाशिक, सिन्नर आदी तालुक्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये मर्दानी खेळ समजला जाणारा कुस्त्यांचा आखाडा आज रंगला आणि या नेत्रदीपक कुस्त्यांनी धामणीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.गावकऱ्यांनी मुलाबाळांसह खंडोबाचे दर्शन घेऊन यात्रेचा आनंद लुटला. ग्रामपंचायत चौकात सकाळी शाहीर बाळासाहेब कन्हेरे आणि पार्टी संविदने कलगीवाले विरुद्ध शाहीर भारत भगवंत थोरात आणि पार्टी चांडोलीकर तुरेवाले यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम झाला. पंचक्रोशीतील शेकडो रसिकांनी या कलगीतुऱ्याचा लाभ घेतला. संध्याकाळी मंदिर परिसरालगत गावातून वाजत-गाजत आखाडा मिरवत नेण्यात आला. या अखाड्यासाठी लहान पहिलवानांबरोबरच संगमनेर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, देहू, आळंदी येथील नामांकित पहिलवानांनी हजेरी लावली. ५० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत अशी एकूण ५०,००० हजारांपर्यंतची रोख बक्षिसे देण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्यावतीनेही विविध कुस्त्या लावण्यात आल्या.बहुतेक कुस्त्या निकाली झाल्या. या आखाड्यामध्ये पंच म्हणून, ठकाराम गाढवे, दिनकर भूमकर यांनी काम पाहिले. त्याचप्रमाणे या आखाड्याची व्यवस्था शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र करंजखेले, माजी सरपंच सुनील जाधव, गजाराम पाटील जाधव, मनदेव वाकचौरे, शांताराम जाधव, अमोल जाधव, अंकुशराव भूमकर, विठ्ठल करंजखेले गुरुजी, वामनराव जाधव, दत्ता गवंडी, अविनाश बढेकर आदींनी पाहिली. विष्णुकाका हिंगे, महेंद्र वाळुंज, अरुण गिरे, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे यांनीही आखाड्याला भेट दिली.
नेत्रदीपक कुस्त्यांचा रंगला आखाडा
By admin | Updated: February 13, 2017 01:17 IST