पुणे : ज्या बालकांना काही कारणाने आपल्या मातेचे दूध मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून शासकीय रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. ही बालके मातेच्या दूधापासून वंचित राहू नयेत, यासाठी एक विशेष वाहिका तयार करण्यात आली आहे. त्यामार्फत घरोघरी जाऊन स्तनदा मातांच्या दुधाचे संकलन केले जाईल. हा संपूर्ण भारतातील पहिलाच उपक्रम असून, बालके मातेच्या दुधापासून वंचित राहू नयेत, हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात एका वर्षात साधारण ९ हजारांहून अधिक बालके जन्माला येतात. यात काही मातांना विविध कारणांनी आपल्या बाळाला दूध पाजणे शक्य होत नाही. मात्र, त्यांची बालके आईच्या दुधापासून वंचित राहू नयेत, यासाठी रुग्णालयातर्फे तीन वर्षांपासून मिल्क बँक चालविण्यात येते. बालकांना आईच्या दुधाची असणारी गरज लक्षात घेऊन यापुढे दूधसंकलन करण्याच्या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या खडसे यांनी सांगितले. मातेचे दूध हा सर्वोत्तम आहार असून, त्याबाबत अजूनही आपल्या समाजात पुरेशी जागृती नाही. त्यामुळे या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृतीही होण्यास मदत होईल, असे डॉ. खडसे म्हणाल्या. ही व्हॅन सर्व सुविधांनी युक्त असून, तीमध्ये दूध संकलन करण्याची सुविधा आहे. रोटरी क्लब आॅफ पूनाच्या मदतीने हा उपक्रम जागतिक स्तनपान आठवड्याच्या निमित्ताने लवकरच सुरू होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. ही व्हॅन आठवड्यातून तीन दिवस विशिष्ट मार्गाने जाणार असून, त्यामार्फत बालकाची तसेच मातेची तपासणीही करण्यात येईल. स्तनदा मातांचे दूध दान करण्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे. या व्हॅनमुळे वेळेआधी जन्माला आलेल्या बालकांना तसेच ज्या माता काही कारणांनी आपल्या बाळाला दूध देऊ शकत नाहीत त्यांना हे दूध देण्यात येईल. ६ महिन्यांपर्यंत मातेचे दूध अत्यावश्यक असल्याने बालकाच्या उत्तम वाढीसाठी रुग्णालयातर्फे हा उपक्रम चालू करण्यात येत आहे. - डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून शासकीय रुग्णालय
घरोघरी मातेच्या दुधाचे संकलन
By admin | Updated: July 29, 2016 03:51 IST