मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील आधार कार्ड योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद असून कार्ड काढता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे या ठिकाणी आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिले. वेल्हे तालुक्यातील आधार काढण्यासाठीची योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. वेल्हे तालुक्यातील गावे अतिशय दुर्गम व डोंगरदऱ्यात वसलेली आहेत. आधार कार्ड योजना वेल्ह्यात सुरू झाल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. कोणतीही दळवळणाची साधने नसताना नागरिकांनी वेल्ह्यात रांगा लावून आधार कार्ड काढले होते. परंतु अद्यापही तालुक्यातील हजारो नागरिक आधार कार्डापासून वंचित राहिले आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून वेल्ह्यातील आधार कार्ड काढण्याची योजना बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, तसेच पंचायत समितीमधील विविध योजना व गॅसधारक सबसिडीपासून वंचित राहिले आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरूआहेत. काही उमेदवारांना आधार कार्ड नसल्याने अर्ज भरता आले नाहीत. शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यक आहे. विद्यालयांनी आधार कार्ड अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाहीत. या अडचणी दूर करण्यासाठी येथे केेंद्राची मागणी होत आहे.
वेल्ह्यातील आधार केंद्र बंद
By admin | Updated: July 27, 2015 04:01 IST