ग्रामपंचायत कदमवाकवस्तीने या प्रलंबित निधीसाठी जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार समक्ष भेटून व फोनद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला व निधी न मिळण्याचे कारण देखील विचारले. परंतु निधी मिळण्यास विलंब होत असल्याने सरपंच गौरी गायकवाड यांनी जिल्हा परिषद प्रशासनास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. जिल्हा परिषदेच्या चुकीमुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचा बँक खाते नंबर चुकीचा नोंदवला गेल्यामुळे निधी वर्ग होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. विकास कर, प्रशुमन व दंडाची मिळून एक कोटी व १५ व्या वित्त आयोगाचा ६६ लक्ष एवढा निधी प्रलंबित राहिल्याने निविदा निघून पण विकासकामे ठप्प झाली आहेत, अशी माहिती सरपंच गौरी गायकवाड यांनी दिली. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रलंबित निधी जमा होत नसल्याने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्यासाठी सरपंच व सदस्य गेले असता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी तत्काळ प्रलंबित निधीच्या फाईलवर सही करून दोन दिवसांत निधी खात्यावर वर्ग होईल, अशी हमी दिली.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांच्याकडून प्रलंबित निधी वर्ग करण्याचे पत्र स्वीकारताना सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड.