लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेत होत असलेला गैरव्यवहार असो, स्थानिक पोलिसांकडून दखल घेण्यास उदासीनता दाखवली जात असेल, तर नागरिक आता थेट पंतप्रधान कार्यालयाकडे दाद मागू लागले आहेत. पिंपरीत एका फोटो स्टुडिओ व्यावसायिकाने त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत पोलिसांकडे दाद मागितली. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कटू अनुभव येताच संबंधित फोटो स्टुडिओ संचालकाने थेट पीएमओ कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.केंद्र शासनाने घोषित केलेल्या मुद्रा योजनेंतर्गत कर्ज पिंपरीतील सुदर्शन सदाफुले यांनी १० लाखांचे कर्ज घेतले. घेतलेल्या कर्जाचे हप्ते त्यांनी मार्च २०१७ पर्यंत नियमित भरले. त्यांनी पिंपरीत फोटो स्टुडिओ उभारण्यासाठी जागा भाड्याने घेतली. फर्निचर व स्टुडिओचा सेटअप उभारण्यासाठी त्यांनी मोठा खर्च केला. स्टुडिओ सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या स्टुडिओतील साहित्याची चोरी झाली. दोन वेळा स्टुडिओतील साहित्याची चोरी झाली. महागडे कॅमेरे, लेन्स आदी साहित्य चोरीला गेले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. संशयितांची नावे दिली. मात्र, पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. पोलिसांनी संबंधित संशयितांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. समज देऊन सोडून दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवूनही काही उपयोग झाला नाही.मुद्रा योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे त्यांना जिकिरीचे ठरू लागले. स्टुडिओचे नुकसान झाल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. स्टुडिओचे साहित्य परत मिळवून देण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळावे, असे निवेदन सदाफुले यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे दिले आहे.
नागरिकांची धाव थेट पंतप्रधान कार्यालयाकडे
By admin | Updated: July 3, 2017 03:14 IST