लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : दोन वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने महामार्गावर सहा तास पाठलाग करून जेरबंद केले आहे.
याप्रकरणी रूपेश बबन झोंबाडे (वय २९, रा. भीमनगर, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश याने दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. तेव्हापासून रुपेश हा फरार होता. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार आरोपीच्या मागावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, हवालदार नितीन गायकवाड, विजय गाले, रोहिदास पारखे, मारूती बाराते हे बऱ्याच दिवसांपासून होते.
गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवून गुन्हातील आरोपी रूपेश झोंबाडे याचा सलग ६ तास सातारा-पुणे महामार्गावर पाठलाग केला. अखेर त्यास तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथून ताब्यात घेऊन अटक केली.